कोरोनामुक्त अजित पवारांना मिळाला डिस्चार्ज, पण आठ दिवस राहणार होम क्वारंटाइन


मुंबई – मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून कोरोनामुक्त झालेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यासंदर्भातील माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअॅप स्टेट्सच्या माध्यमातून दिली आहे.

कोरोनाच्या संकट काळात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सतत दौऱ्यांवर होते. विविध ठिकाणी भेटी, मंत्रालयातील बैठका तसेच अतिवृष्टीच्या काळात फटका बसलेल्या भागाची पाहणी करण्यासाठी ते दौरे करत होते. त्यांना याच दरम्यान काहीसा थकवा जाणवत असल्यामुळे ते चार-पाच दिवस होम क्वारंटाइन झाले होते. त्यानंतर कोरोनाची चाचणी केल्यानंतर ते पॉझिटिव्ह असल्याचे आढळले होते. त्यानंतर खबरादारीचा उपाय म्हणून ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांना उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर ते आता कोरोनामुक्त झाले असून रुग्णालयातून त्यांना डिस्चार्जही देण्यात आला आहे. दरम्यान, ते घरी परतल्यानंतर आठ दिवस घरीच विश्रांती घेणार असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या व्हॉट्सअॅप स्टेट्सद्वारे दिली आहे.