
सिंधुदुर्ग : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारने तत्कालीन फडणवीस सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांना केराची टोपली दाखवली आहे. त्यातच आता शिवसेना नेते आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सिंधुदुर्गात बोलताना घरबांधणी परवानगीचे अधिकारही पुन्हा ग्रामपंचायतीकडे देण्यात येणार असल्याची घोषणा केली.
फडणवीस सरकारच्या आणखी एक निर्णयाला ठाकरे सरकारने दाखवली केराची टोपली
घर बांधणीच्या परवानगीचे अधिकार फडणवीस सरकारने ग्रामपंचायतीकडून काढून घेऊन टाऊन प्लानिंगकडे (जिल्हा स्तरावर) दिल्यामुळे नागरिकांना ग्रामीण भागात बांधकाम परवानगीसाठी अडचणी येत होत्या. या निर्णयाला लोकप्रतिनिधींनीही विरोध केला होता. याची दखल घेऊन फडणवीस सरकारचा हा निर्णय महाविकास आघाडी सरकारने रद्द केला. आता पुन्हा एकदा ग्रामपंचायतीकडे घर बांधणी परवानगीचे अधिकार देण्यात आल्याची घोषणा अब्दुल सत्तार यांनी सिंधुदुर्गात केली.
दरम्यान, आता परराज्यातील घुसखोरी करणाऱ्या मच्छिमारी बोटींवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या हद्दीत घुसणाऱ्या बोटींवर दंडात्मक कारवाईसाठी वेगळा कायदा केला जाणार आहे. त्यासाठी मत्स्यविभागाचे मंत्री अस्लम शेख यांची येत्या 15 दिवसात बैठक होणार असून त्यांनंतर या संदर्भातील निर्णय घेतले जाणार आहेत, अशी माहिती रत्नागिरीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.
