
मुंबई – महाविकास आघाडी सरकारने केंद्रीय रेल्वे विभागाला मुंबईतील सर्वसामान्य लोकांसाठी रेल्वेची उपनगरी लोकल सेवा सुरू करण्यासाठी रीतसर पत्र पाठवले आहे. पण ही सेवा सुरू करण्याच्या कामात रेल्वे विभाग खोडा घालत असल्याचा आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. सामान्य मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी लवकर लोकलसेवा सुरू करावी, यात राजकारण करण्याचे काहीच कारण नाही, असा टोला गृहमंत्री देशमुख यांनी लगावला आहे.
मोदी सरकारमुळे रखडला मुंबईकरांना लोकल प्रवास; अनिल देशमुख यांचा आरोप
सर्वसामान्य प्रवाशांना ठराविक वेळा मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेली रेल्वेची लोकल सेवा उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून गर्दी टाळता येईल, अशा पद्धतीचे तपशीलवार पत्र केंद्रीय रेल्वे मंत्रालयास देण्यात आले होते. लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू झाली, तर त्यांना दिलासा मिळेल. यात रेल्वेने कोणत्याही प्रकारचे राजकारण करू नये, असे देशमुख यांचे म्हणणे आहे. यापूर्वीही परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी पाठवताना रेल्वे आणि राज्य सरकार यांच्यात वाद झाला होता. आता पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारने पश्चिम आणि मध्य रेल्वेला मुंबईकरांना सरसकट लोकल सुरू करण्यासंदर्भात पत्र पाठविले होते. रेल्वे प्रशासनाकडून या पत्राला उत्तर आले आहे. रेल्वे विभागाने राज्य सरकारला पत्राद्वारे लोकल सुरू झाल्यावर गर्दीचे नियोजन कसे करणार, अशी विचारणा केली आहे. त्याचबरोबर राज्य सरकार आणि रेल्वे यांची शिवाय लोकल सुरू करण्यासंदर्भात संयुक्त बैठक लवकर व्हावी. यात गर्दीचे नियोजन करण्याच्या संदर्भात व्यवहार्य मार्ग काढावा, असे पत्रात म्हटले आहे. प्रत्येक तासाला महिला स्पेशल गाडी चालविणे तूर्तास शक्य नसल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे.
