सांगली महापौरांच्या घरावर आयकर विभागाचे छापे

सांगली: दुष्काळग्रस्त सांगली जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या सांगलीचे प्रथम नागरिक असूनही रविवारी आपल्या मुलाच्या लग्नात कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी करणारे इद्रिस नायकवडी यांच्यावरही आयकर विभागाची वक्रदृष्टी पडली आहे.आयकर खात्याच्या अधिकार्‍यांनी नायकवडी यांच्या घरावर छापे टाकले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोठात चलबिचल सुरू आहे.

सांगली जिल्हा गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सोसतो आहे. पाण्यासाठी, जनावरांच्या चार्‍यासाठी सरकार दरबारी साकडे घातले जात आहे. मात्र याचे जराही भान न ठेवता शहराचे महापौर इद्रिस नायकवडी यांनी रविवारी आपल्या मुलाचे लग्न शाही थाटात करून कोट्यवधींची उधळपट्टी केली. नायकवडी यांनी मुलाच्या लग्नात पालिकेच्या कर्मचार्‍यांनाही वेठीस धरल्याचा आरोप आहे. मिरजमधील महापालिकेच्या शाळेच्या प्रांगणात २ हजार ७०० किलो मटनाची पंगत उठली. सुमारे ४० हजार लोकांनी शाही भोजनाचा लाभ घेतला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि केंद्रिय कृषिमंत्री शरद पवार यांना नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांच्या मुलांच्या लग्नातील शाही थाट पाहून रात्रभर झोप न आल्याचे सांगत त्यांनी जाधवांचे आणि एकूणंच समाजकारण, राजकारणात कार्यरत असलेल्यांचे कान टोचले.

राज्यात दुष्काळ असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शाही थाटात लग्नाचा बार राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना आणि महापौरांना चांगलांच महागात पडला. एका कंत्राटदारालाही शाही विवाह अडचणीचा ठरला. या सर्वांवर आयकर विभागाच्या अधिकार्‍यांनी धाड टाकली. राज्यमंत्री भास्कर जाधव यांच्या चिपळूण येथील घरावर तर त्यांना कथित मदत करणारे शहा कंत्राटदार (किंवा जाधवांच्या खुलाशाप्रमाणे केटरर) यांच्या कराड येथील घर आणि हॉटेलवर छापा टाकण्यात आला.

सांगलीचे महापौर इंद्रिस नायकवडी यांच्या घरावर आयकरच्या अधिकार्‍यांनी धाड टाकली. त्यामुळे राज्यातील शाही विवाह सध्या चांगलेच चर्चेत आहेत. मुलांच्या शाही विवाह सोहळ्यात उधळपट्टी करणार्‍या राज्यमंत्री भास्कर जाधव यांच्यानंतर आता दुष्काळग्रस्त सांगलीचे महापौर इद्रिस नायकवडी यांच्या घरावरही आयकर खात्याची वक्रदृष्टी पडली.