कसोटीसाठी भज्जी, आश्विनमध्ये स्पर्धा

मुंबई: ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेसाठी भारताचा दिग्गज ऑफस्पिनर हरभजनसिंग याची निवड झाली आहे. त्यामुळे चेन्नई येथे होणा-या पहिल्या कसोटीसाठी अतिंम संघात त्याचा समावेश होण्याची शक्यता आहे. ही त्याच्या कारकीर्दीतील शंभरावी कसोटी असणार आहे. मात्र या सामन्यात त्याचा प्रतिस्पर्धी असलेला अश्विनशी स्पर्धा लागली आहे. त्यामुळे अतिंम अकरा जणांच्या संघात कोणाचा समावेश होणार याबाबत उत्सुकता कायम आहे.

हरभजनची अंतिम अकरा खेळाडूंत सहभागी होण्यासाठी दुसरा ऑफस्पिनर आर. अश्विनशी स्पर्धा आहे. पर्दापण केल्यापासून अश्विन टीम इंडियाचा अविभाज्य घटक बनला आहे. भारतात झालेल्या दोन सराव सामन्यात अध्यक्षीय संघ आणि भारत अ संघाविरुद्ध ऑस्ट्रेलियन फलंदाजांची कामगिरी दुबळी झाली. सुरुवातीला जम्मू-काश्मीरचा ऑफस्पिनर परवेज रसूलने अध्यक्षीय संघाकडून सात गडी बाद केले. यानंतर दुस-या लढतीत डावखुरा फिरकीपटू राकेश धु्व आणि ऑफस्पिनर जलज सक्सेना यांनी भारत अ संघाकडून ऑस्ट्रेलियन फलंदाजांवर दबाव निर्माण केला. धु्वने सामन्यात एकूण सहा गडी, तर जलजने पाच विकेट घेतल्या.

रणजी सत्रात हरभजनची सर्वोत्तम कामगिरी सौराष्‍ट्र विरुद्ध ६० धावांत ४ विकेट अशी ठरली. रणजी विजेता मुंबईविरुद्ध शेष भारताकडून खेळताना हरभजनने ६४ धावांत ३ आणि ३८ धावांत २ विकेट घेतल्या होत्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत चांगल्या कामगिरी करण्याच्या अपेक्षेने त्याची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्च्या या सामन्यात हरभजन आणि अश्विन यांच्यात स्पर्धा आहे.