संरक्षण उत्पादनात स्वयंपूर्णता आवश्यक: संरक्षणमंत्री

नवी दिल्ली: भारताला संरक्षण साहित्य उत्पादनाच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण बनविण्यासाठी शासकीय, सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांनी समन्वयाने कालबद्ध प्रयत्न करण्याची आवश्यकता असून त्यासाठी सरकारकडून संपूर्ण मदत दिली जाईल; अशी ग्वाही संरक्षण मंत्री ए. के. एन्थोनी यांनी दिली. या स्वयंपूर्णतेतून या क्षेत्रातील भ्रष्टाचार निपटला जाईल; अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ)च्या अधिवेशनात संरक्षणमंत्री बोलत होते.
भारतीय सैन्यदले, डीआरडीओ, सरकार, सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील उद्योग या सर्वांनी एकत्र येऊन संघटीत प्रयत्न केल्यास भारत संरक्षण साधनांच्या उत्पादनात स्वयंपूर्ण होऊ शकेल; असे एन्थोनी म्हणाले.

संरक्षण साधनांच्या व्यवहारातील भ्रष्टाचाराबद्दल बोलताना संरक्षणमंत्री म्हणाले की; या संबधातील प्रत्येक आरोपाच्या मुळाशी पोहोचून दोषींना शिक्षा होईल; यासाठी पुरेपूर प्रयत्न केले पाहिजेत. करदात्यांचा एक रुपयाही वय जाणार नाही; याबाबत दक्ष राहण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादन केली.