
मुंबई: भारतीय जनता पक्षाच्या अध्यात्मिक आघाडीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची राज्यातील मंदिरं खुली करण्याच्या मागणीसाठी भेट घेतली. त्यांनी राज्यपालांना मंदिरे उघडण्याची मागणी करणारे पत्र दिले. त्याचबरोबर १ नोव्हेंबरपर्यंत मंदिरे खुली करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने न घेतल्यास मंदिरांची टाळी फोडू, असा स्पष्ट इशारा भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसलेंनी राज्यपालांच्या भेटीनंतर दिला आहे.
ठाकरे सरकारने १ नोव्हेंबरपर्यंत मंदिरे खुली न केल्यास मंदिरांची टाळी फोडू; भाजपचा इशारा
गेल्या ७ महिन्यांपासून राज्यातील मंदिरे बंद आहेत. राज्यातील इतर सर्व गोष्टी सुरू करण्यात आलेल्या असताना मंदिरे मात्र बंद ठेवण्यात आली आहेत. याआधी आम्ही राज्यभर मंदिरे खुली करण्याच्या मागणीसाठी घंटानाद आंदोलन केले. पण त्याची दखल ठाकरे सरकारने घेतली नाही. आता सरकारने १ नोव्हेंबरपर्यंत मंदिरे खुली करण्याचा निर्णय घ्यावा. अन्यथा मंदिरांची टाळी फोडू, अशी भूमिका भोसलेंनी मांडली.
भाजपच्या अध्यात्मिक आघाडीने काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे भेटीसाठी वेळ मागितली होती. पण मुख्यमंत्री कार्यालयाकडून त्यांना वेळ दिली गेली नाही. त्यानंतर सरकारला अध्यात्मिक आघाडीने दसऱ्यापर्यंतची मुदत दिली होती. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा आघाडीकडून देण्यात आला. पण मंदिरे खुली करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला नसल्यामुळे भाजपच्या अध्यात्मिक आघाडीने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे.
