सांगली: नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांच्या मुलांच्या लग्नसोहळ्यातील उधळपट्टीबाबत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी गाळलेले अश्रू हे नक्राश्रू असून पवार हे जाणते राजे नव्हे; तर लुटारूंचे राजे आहेत; अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केली.
जाधवांच्या सोहळ्यातील उधळपट्टी बघून आपल्याला झोप आली नसल्याचे सांगणारे पवार वनमंत्री पतंगराव कदम आणि कृष्णा खोरे लुटून खाणार्या बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या घरातील लग्न सोहळ्यांना उपस्थित होते. तिथे पवारांना उधळपट्टी दिसली नाही का; असा सवाल शेट्टी यांनी केला.
पवारांनी वसंतदादा पाटील, नागनाथ अण्णा नायकवडी यांचा विश्वासघात केला असून अशा विश्वासघाती माणसांविरुद्ध मी लढत आहे. त्यांना शेतकऱ्याची ताकद दाखविल्याशिवाय राहणार नाही; असा इशाराही शेट्टी यांनी दिला.