जादुटोणा विरोधी कायद्यासाठी सह्यांची मोहीम

पुणे: जनतेने श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील पुसट रेषा लक्षात घेतली पाहिजे. त्याबाबत गल्लत करू नये. एकीकडे माणूस चंद्रावर जातोय, विज्ञान आणि तंत्रज्ञानात प्रगती करतोय आणि दुसरीकडे या जादूटोणाविरोधी विधेयकाला विरोध केला जातोय; ही खेदाची बाब आहे असे मत व्यक्त करून; हा कायदा तातडीने व्हावा; यासाठी आपण पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करू; असे आश्‍वासन खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी दिले.

जादूटोणा विरोधी कायद्याचा प्रस्ताव देऊन १४ वर्षे पूर्ण झाली. मात्र हा कायदा करण्यात शासनाला अद्याप यश आलेले नाही. हा कायदा लवकरात लवकर तयार करण्यात यावा यासाठी राज्यातील नागरिकांच्या १४ हजार स्वाक्षर्‍यांचे निवेदन सरकारकडे देण्यात येणार आहे. त्याची सुरूवात आज महात्मा फुले वाड्यातून करण्यात आली. खासदार सुप्रिया सुळे यांनी हा कायदा संमत करण्यात यावा म्हणून पुढाकार घेतला असून मागणीच्या निवेदनावर त्यांची स्वाक्षरी करून सुरूवात केली.

यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर, ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू, ज्येष्ठ समीक्षक रा. ग. जाधव, माजी पोलीस अधिकारी अशोक धिवरे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ, प्रा. सुभाष वारे, अविनाश पाटील आदी उपस्थित होते.

वारकरी संप्रदायाचाही या कायद्याला असलेला विरोध मावळला आहे. तेव्हा शिवसेना आणि भाजपनेही विरोध न करता सर्वच राजकीय पक्षांनी इच्छाशक्ती दाखवून हा कायदा पास करावा; असे आवाहन डॉ. दाभोळकर यांनी केले. जादूटोणा विरोधी कायदा संमत करावा म्हणून आम्ही महाराष्ट्राच्या सर्व भागात फिरून जनतेमध्ये जागृती करणार आहोत. यासंदर्भात १४ हजार स्वाक्षर्‍यांचे निवेदन सरकारला देण्यात येणार आहे; असेही डॉ. दाभोळकर यांनी सांगितले.

अंधश्रद्धेच्या अघोरी प्रथांना सर्वांत जास्त महिलांना बळी पडावे लागते. म्हणून महिलांच्या सुरक्षिततेसाठी हा कायदा होणे फार गरजेचे असल्याचे विद्या बाळ यांनी सांगितले.