उद्धव ठाकरे हे कागदी शेर: शरद राव

मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ही एक शक्ती होती तर शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे हे फक्त कागदी शेर आहेत. शरद पवार यांच्यावर टीका करण्याची त्यांची लायकी नाही; अशी खरमरीत टीका आज राष्ट्रवादीचे नेते व म्युनिसीपल मजदूर युनियनचे अध्यक्ष शरद राव यांनी केली. संपासाठी झालेल्या डावे व शिवसेनेच्या हातमिळवणीवरही त्यांनी तोफ डागली.

अकरा केंद्रीय संघटनांनी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारला आहे. या संपाला कालपर्यंत पाठींबा असल्याचे सांगणार्‍या शरद राव यांनी आज कोलांटउडी मारली. शिवसेनेप्रमाणे केवळ औद्योगिक क्षेत्रात असलेली आमची युनिट संपात उतरतील; असे राव यांनी सांगितले. मुंबईत पालिका, बेस्ट, रिक्षा, रुग्णालये तसेच फेरीवालेही संपात उतरणार नसल्याचे त्यांनी सांगितले. ठाणे, नवी मुंबईतील कारखाने बंद राहतील तसेच तारापूर येथे निदर्शने करण्यात येतील; असे ते म्हणाले.

मुंबईत काल डाव्यांच्या साथीने शिवसेनेने काढलेल्या मोर्चावर राव यांनी टीका केली. ते म्हणाले की; देशव्यापी संप पुकारणार्‍या कम्युनिस्टांना महाराष्ट्रात शिवसेनेचे नेतृत्व का लागते हा मोठा प्रश्न आहे. या मोर्चात एकजुटीचा नारा देणारी शिवसेना दुसरीकडे केवळ कंपन्यांमध्ये बंद पाळणार; असे सांगत आहे. ही तडजोड कडकडीत बंदची भाषा करणार्‍या कम्युनिस्ट संघटनांनी कशी मान्य केली; असा सवालही राव यांनी केला.

कामगारांच्या मागण्यांचा विचार करण्यासाठी केंद्र सरकारने ए. के. अ‍ॅन्टोनी यांच्या नेतृत्वाखाली समिती बनवली असून असे पहिल्यांदाच घडत आहे. त्यामुळे खरे तर ही एक चांगली संधी चालून आली आहे. सर्व कामगार संघटनांनी कामगार हितासाठी सरकारशी चर्चा करायला हवी; असे आवाहन राव यांनी केले.

Leave a Comment