आंदोलनादरम्यान अण्णांना मृत्यू यावा अशी केजरीवालांची होती इच्छा- स्वामी अग्निवेशांचा दावा
नवी दिल्ली: जंतर-मंतरवर उपोषणादरम्यान अण्णा हजारे यांचा मृत्यू व्हावा अशी अरविंद केजरीवाल यांची इच्छा होती; असा गौप्यस्फोट टीम अण्णांचे माजी सदस्य स्वामी अग्निवेश यांनी केला आहे. स्वामी अग्निवेश यांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, एप्रिल २०११ मध्ये जंतर-मंतरवर झालेल्या उपोषणादरम्यान ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना उपोषण करताना मृत्यू यावा अशी इच्छा अण्णाचे सहकारी अरविंद केजरीवाल यांची होती; असा धक्कादायक गौप्यस्फोट टीम अण्णाचे माजी सदस्य स्वामी अग्निवेश यांनी केला आहे. स्वामी अग्निवेश यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हा खळबळजनक खुलासा केल्यामुळे आता आणखी एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
अण्णा हजारे यांनी देशातील भ्रष्टाचार मिटविण्यासाठी व त्यासाठी जनलोकपाल विधेयक पारित करण्यासाठी जंतर-मंतरवर एप्रिल २०११ मध्ये आंदोलन केले होते. त्यावेळी स्वामी अग्निवेश हे त्या आंदोलनातील टीम अण्णाचे सक्रिय सदस्य होते. याबाबतचा खुलासा करताना अग्निवेश यांनी सांगितले की; जनलोकपालसाठी अण्णांनी उपोषण करण्याचे निश्चित केले तेव्हा मी विरोध केला. अण्णासारख्या वयोवृद्ध व्यक्तीला उपोषणाला बसवू नये या मताचा मी होतो.
त्याबाबत मी जेव्हा अरविंदला विचारणा केली तेव्हा केजरीवाल मला म्हणाले होते की, अण्णांचे बलिदानामुळे देशात क्रांती येईल. जरी अण्णांचा उपोषणादरम्यान मृत्यू झाला तरी आंदोलन अधिक वेगाने देशात पसरेल व ते या लढ्यासाठी फायद्याचे ठरेल.
मनमोहन सिंग सरकारने अण्णांच्या काही मागण्या मान्य केल्यानंतरही आणखी आठवडाभर तरी अण्णांनी उपोषण सुरूच ठेवावे; यासाठी केजरीवाल प्रयत्नशील होते, असा आरोपही अग्निवेश यांनी केला. याची माहिती किरण बेदी यांना होती; अशी पुष्टीही त्यांनी जोडली. केजरीवाल ही व्यक्ती खूप महत्वाकांक्षी असून अण्णांचा त्यांनी पद्धतशीर वापर केला. देशभर आपली प्रतिमा तयार करण्यासाठीच आंदोलनाचा खाटाटोप केजरीवाल आणि कंपनीने केला असेही स्वामी यांनी आपल्या मुलाखतीत स्पष्ट केले.