
मुंबई – सतत काहीना काही वक्तव्य करुन चर्चेत असलेली अभिनेत्री कंगना राणावत पुन्हा एकदा गोत्यात येण्याची चिन्हे आहेत. कंगना विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर ट्विटरवर न्यायव्यवस्थेवरच कंगनाने चिखलफेक केली आहे. न्यायसंस्थेबाबत ट्विटरवर अपमानकारक पोस्ट केल्याप्रकरणी तिच्या विरोधात एका वकिलाने तक्रार केली आहे.
न्यायव्यवस्थेबाबत अपमानास्पद ट्विट करणाऱ्या कंगनाविरोधात वकिलाची तक्रार
कंगना आणि तिच्या बहिणीला वांद्रे मेट्रोपोलिटीन कोर्टाच्या आदेशावरून एका प्रकरणात पोलीस ठाण्यात हजर राहण्याबाबत समन्स बजावण्यात आले आहे. त्यावर कंगनाने ट्विट करत देशातील धर्मांबाबत येथील कायदा आणि सरकारी संस्थांबाबत बॉलीवूड कलाकारांना आदर नाही. अगदी न्यायव्यवस्थेची चेष्टा चालवली असल्याचे ट्विट केले होते.
अॅड. अली कासिफ खान देशमुख यांनी याविरोधात देशद्रोहाचा आणि दोन धार्मिक गटांमध्ये मतभेद निर्माण केल्याचा कंगनावर आरोप करत अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्टात तक्रार दाखल केली. तसेच आपल्या ट्विटमध्ये कंगनाने न्यायसंस्थेचा पप्पू सेना असाही उल्लेख केल्याचे अॅड. खान देशमुख यांचे म्हणणे आहे. 10 नोव्हेंबर रोजी याप्रकरणी अंधेरी येथील कोर्टात सुनावणी होणार आहे.
