मायावतींना वेध लागलेत लाल किल्ल्यावरील भाषणाचे!

नागपूर: मायावतींचे नाव जरी घेतले तरी सर्वांचे कान पुढचे वाक्य काय असेल याकडे असतात. सध्या नागपुरात एक होर्डिंग सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ते होर्डींग दुसरे तिसरे कशाचे नसून बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती या थेट लाल किल्ल्यावरून भाषण देत आहेत, असे होर्डिंग उभारण्यात आले आहे.

नागपुरातील कस्तुरचंद्र पार्कात रविवारी बसपाचं महासंमेलन होणार आहे. त्यासाठी बसपाने जय्यत तयारी सुरु केली असून त्याचाच एक भाग म्हणून, मायावतींचे होर्डिंग उभारण्यात आले आहे. मायावती केवळ होर्डिंग्जवरच दिसणार नाहीत; तर ज्या ठिकाणाहून मायावती भाषण देणार आहेत; तो सेटही लाल किल्ल्याचीच प्रतिकृती उभारण्यात आली आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर देशात पंतप्रधानपदासाठी एनडीएकडून मोदींच्या नावाचा डंका पिटला जात आहे. यूपीएने अजून आपले पत्ते खोललेले नाहीत. पण या शर्यतीत आपणही मागे नसल्याचे मायावतींच्या या होर्डींग्ज आणि भाषणाच्या सेटवरुन दिसून येत आहे.