अलीगढमध्ये साध्वी व मोदींना फाशी देण्याची मागणी

आग्रा- संसदेवर हल्ल्याचा मुख्य सुत्रधार अफझल गुरुला फाशी दिल्यानंतर अलीगढ मुस्लिम विद्यापीठात (एएमयू) वातावरण गरम झाले आहे. विद्यापीठात सलग दुसर्‍या दिवशी मंगळवारी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. तसेच त्यांनी अफझल गुरुला शहीदचा दर्जा देत साध्वी प्रज्ञासिंग आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना फाशी देण्याची मागणी केली.

आंदोलनात सहभागी झालेले बहुतांश विद्यार्थी कश्मिरी होते. त्यांच्या हातात पोस्टर आणि बॅनर होते. यात वूई आर ऑल फझल आणि हँग मी टू इंडिया, यू किल्ड वन फझल गेव्ह बर्थ टू हन्ड्रेड फझल असे लिहले होते. या विद्यार्थ्यांनी सांगितले की, साध्वी प्रज्ञासिंग आणि नरेंद्र मोदी यांना फाशी का दिली जात नाही? प्रज्ञासिंगवर दहशतवादी कारवाया सहभागी होण्याचे तर, मोदीवर
गुजरातमधील दंगलीचा ठपका ठेवण्यात आला आहे. या दोघांना फाशी देण्यात यावी.

या आंदोलनामुळे एएमयूमधील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. १६ फेब्रुवारीला येथे दीक्षांत समारंभ आहे. यात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी सहभागी होणार आहेत. येथील विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी समारंभापर्यंत विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे एएमयू प्रशासन काळजीत पडले आहे. सोनिया गांधींच्या दौर्‍यादरम्यान विरोध होणार नाही यासाठी प्रशासन कामाला लागले आहे.

एएमयूमधील या आंदोलनाचे नेतृत्व कश्मिरी विद्यार्थी मो. राऊ करत आहे. त्याचे म्हणणे आहे की, अफझल हा कश्मीरचा भूमिपुत्र आहे. तो कोणत्या तरी जाळ्यात अडकला. मात्र भारतीय न्यायालयांनी त्याला न्याय दिला नाही. अफझलला आपल्या म्हणण्यानुसार वकील ठेवण्याची संधी दिली गेली नाही. तसेच फाशी देण्याअगोदर त्याला कुटुंबियाला भेटू दिले नाही. पत्नीलाही फाशीची माहिती दिली गेली नाही.

राऊ म्हणाला, जम्मू-कश्मिरीला सिलेक्टिव इनजस्टिससाठी बनले आहेत. राजीव गांधी आणि बेअंत सिंग यांच्या मारेकर्‍यांना फाशी का दिली गेली नाही, असा सवालही या आंदोलनकारी विद्यार्थ्यांनी केला. आंदोलनाच्या दरम्यान ही काश्मिरी युवक पॅम्पेलट्स वाटत आहेत.