मुंबई: इंडियन मुजाहिदीन (आयएम) संघटनेचा म्होरक्या यासीन भटकळ आणि त्याच्या तीन साथीदारांची माहिती देणार्यास प्रत्येकी १० लाख रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) या इनामाबाबतची घोषणा केली.
यासीन भटकळची माहिती देणार्यास १० लाखांचा इनाम
यासीन (वय ३०), तहसीन अख्तर वासिम अख्तर शेख (वय २३), असदुल्ला अख्तर जावेद अख्तर (वय २६) आणि अहमद (वय २६) यांच्या अटकेसाठी उपयोगी ठरणारी माहिती पुरवणार्यास प्रत्येकी १० लाख रुपयांचे इनाम दिले जाणार आहे, असे एटीएसचे प्रमुख राकेश मारिया यांनी आज स्पष्ट केले.
हे चारही दहशतवादी मुंबईत १३ जुलै २०११ रोजी तीन ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटांच्या प्रकरणात वॉन्टेड आहेत. पुण्यात जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या स्फोटांच्या प्रकरणातही तहसीन वगळता तिघे सुरक्षा यंत्रणांना हवे आहेत. याशिवाय, अहमदाबाद, सुरत, बंगळूर, दिल्ली आणि हैदराबादमध्ये झालेल्या विविध बॉम्बस्फोट प्रकरणांत यासीन आणि असदुल्लाचा हात असल्याचा संशय आहे.
या चौघांची छायाचित्रे आणि वर्णनाची माहिती असलेली पत्रकेही एटीएसने जारी केली आहेत.
