महिलांबाबत मानसिकता बदलणे आवश्यक: राष्ट्रपती

नवी दिल्ली: महिलांना आदराची वागणूक मिळण्यासाठी समाजाच्या मानसिकतेत बदल होण्याची गरज आहे; असे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केले.

राष्ट्रपती भवनात दोन दिवसीय ४४ व्या राज्यपाल परिषदेचे उद्घाटन झाले. त्याप्रसंगी राष्ट्रपती बोलत होते. देशाच्या राजधानीत घडलेल्या खळबळजनक सामूहिक बलात्कार प्रकरणाचा संदर्भ त्यांनी यावेळी दिला.

महिलांची सुरक्षा आणि त्यांचे कल्याण आदींमध्ये सुधारणा होण्याच्या दृष्टीने कार्य करण्याचे आवाहन राष्ट्रपतींनी राज्यपालांना केले. देशाच्या अंतर्गत सुरक्षेत २०१२ मध्ये सुधारणा झाली आहे. अर्थात; दहशतवादविरोधी यंत्रणा बळकट करण्याची वचनबद्धताही आणखी मजबूत व्हायला हवी. सीमेवरील राज्यांनी अधिक सतर्कता बाळगायला हवी; असे आवाहनही त्यांनी केले.

जनतेला पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी भूजल व्यवस्थापनाच्या गरजेवर राष्ट्रपतींनी भर दिला. निर्मल भारत अभियान, शिक्षण आदींकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहनही त्यांनी राज्यपालांना केले.