
नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयात आज महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंदर्भातील दाखल याचिकेवर सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने या सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्यांना फटकारत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करता येणार नसल्याचे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकार हटवून राष्ट्रपती शासन लागू करण्याची याचिका फेटाळली. याचिकाकर्त्याने ही मागणी राज्य सरकारच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत केली होती.
सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची याचिका
विरोधी पक्षांकडून महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेपासून राज्यातील सरकार पाडण्यासाठी हालचाली करण्यात येत आहेत. हे सरकार म्हणजे तीन पायांची शर्यत असून जास्त काळ टीकणार नसल्याचेही अनेकदा विरोधी पक्षातील काही नेत्यांनी म्हटले होते. त्यातच, राज्याला महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेपासून अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. पण हे सरकार या संकटांचा सामना करताना अपयशी ठरल्याचे सांगत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणीही करण्यात येत होती. पण महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करता येणार नसल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली आहे.
