बलात्कार खटला चालणार दिल्लीतंच

नवी दिल्ली: दिल्लीत झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणाची सुनावणी दिल्ली बाहेर करण्याची या खटल्यातील एका आरोपीची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. मुख्य न्यायधीश अल्तमस कबीर यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे ही याचिका सुनावणीसाठी होती. त्यांनी ती फेटाळून लावली आहे.

या खटल्यात आरोपीतर्फे वकिल म्हणून ज्या एम एल शर्मा यांनी बाजू मांडली आहे त्यांना आपण वकिल पत्र दिलेले नाही किंवा त्यंाना आपल्यावतीने बाजू मांडण्यास आम्ही सांगितलेले नाही अशी माहिती संबंधीत आरोपीनी दिली असल्याची माहिती खंडपीठाने आजच्या सुनावणीच्यावेळी शर्मा यांच्या निदर्शनाला आणून दिली. त्यावर शर्मा यांनी असे सांगितले की जरी आरोपींनी त्यांच्यावतीने बाजू मांडण्यास अनुमती दिली नसली तरी मला व्यक्तीश या प्रकरणात एक पार्टी म्हणून म्हणणे मांडण्यास अनुमती दिली जावी. परंतु त्यांची ती मागणीही नाकारण्यात आली.

या प्रकरणातील मुकेश नावाच्या आरोपीकडून याचिका करण्यात आल्याचे सांगीतले गेले होते. परंतु ज्या सत्र न्यायालयात हे प्रकरण सध्या सुरू आहे तेथील न्यायालयाने मुकेश याला व्यक्तीश विचारून त्याला हे प्रकरण दिल्ली बाहेर नेण्याची इच्छा आहे काय याची विचारणा करावी असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आता मुकेश कडून व्यक्तीगत स्वरूपात माहिती घेऊन नंतर या प्रकरणावर निर्णय दिला जाणार आहे.