सोमालियात पंतप्रधान कार्यालयाबाहेर हल्ला

मोगाडिशु: सोमालियात पंतप्रधानांच्या कार्यालयाबाहेर आज झालेल्या एका आत्मघाती हल्ल्यात किमान सहा जण ठार झाल्याचे वृत्त आहे. तेथे तैनात असलेल्या सुरक्षा जवानांच्या कोंडाळ्यात शिरून आत्मघाती पथकातील एकाने तेथे स्वता भोवती गुंडाळलेली स्फोटके उडवून दिली. त्यात सहा जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

या स्फोटामुळे तेथे मोठा गोंधळ उडाला. अनेक जण जखमीही झाल्याचे वृत्त आहे.हा स्फोट झाला तेव्हा स्वत: पंतप्रधान तेथे उपस्थित होते. तथापि त्यांना यातून कोणतीही इजा पोहोचलेली नाही.या स्फोटानंतर हा सारा परिसर सामान्य लोकांसाठी बंद करण्यात आला आहे.

अद्याप कोणत्याही संघटनेने स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही.तथापी अलकायदाशी संबंधीत शेबाद या संघटनेने हा स्फोट घडवून आणला असावा असा कयास आहे. सोमालियात विद्यमान सरकार पाडून तेथे इस्लामिक क्रांती करण्याचा काही कट्टरपंथीयांचा इरादा आहे. तथापी अफ्रिकन युनियनने 17 हजार जवानांनी फौज सोमालियन सरकारच्या मदतीला पाठवल्याने कट्टरपंथीय बंडखोरांना माघार घ्यावी लागली आहे. त्याचा बदला घेण्यासाठीच त्यांनी हा स्फोट घडवून आणला असावा असा कयास आहे.

Leave a Comment