पुणे दि.२३ – पुण्यातील पानवाल्यांनी राज्यात बंदी असलेल्या गुटख्याची विक्री करण्याची अनोखी युक्ती योजली असल्याचे अन्न औषध प्रशासन विभागाला आढळून आले आहे. पानवाल्यांनी ग्राहकांना गुटखा आणि बंदी असलेले तत्सम पदार्थ सहज उपलब्ध करून देता यावेत यासाठी महिलांना या कामी नेमले असल्याचे अन्न औषध विभागाचे सहआयुक्त शशिकांत केकरे यांनी सांगितले.
केकरे म्हणाले की पानटपर्याा चालक या महिलांकडेच गुटख्याची पाकीटे देतात. दुकानात ग्राहक आल्यावर त्याच्याकडून पैसे घेतात आणि किती पाकिटे ग्राहकाला द्यायची याचा संकेत हे पानटपरीवाले सबंधित माहिलांना करतात. साडीच्या निर्याचत लपविलेली ही पाकिटे नंतर या महिला संबंधित ग्राहकाला देतात. यात महिला आणि ग्राहक यांच्यात थेट पैशांचा व्यवहार होत नसल्याचे कायदेशीर कृती करणे अवघड जाते असेही केकरे म्हणाले. कांही महिन्यांपासून हा प्रकार सुरू असून विभागाने त्यासाठी महिला पोलिसांची नेमणूकही केली आहे मात्र जेथे असे व्यवहार चालतात तेथे पोलिस आल्याची खबर ताबडतोब संबंधितांना लागते आणि हे व्यवहार लगोलग थांबविले जातात असेही आढळले आहे.
अन्न औषध विभागाने १९ जुलै १२ पासून आत्तापर्यंत पुण्यात १ .५२ कोटी रूपयांचा गुटखा जप्त केला आहे. अन्न सुरक्षा व स्टँडर्ड अॅक्ट २००६ची प्रभावी अम्मलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी विकास देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली समितीही स्थापण्यात आली आहे. त्यानुसार ऑगस्ट ११ पासूनच राज्यात प्रत्येक पान टपरीधारकाने परवाना घेणे व दुकानाची नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या कायद्यानुसार आत्तापर्यंत ७९९७ परवाने दिले गेले आहेत असेही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले.