पाकिस्तानी कलाकारांचे यापुढे स्वागत नको:आशा भोसले

पुणे: कलेला कोणत्याही प्रकारच्या सीमा नसतात. ती कुठेही असली तरी चांगली असते, या भावनेतून एक पार्श्‍वगायिका या नात्याने मी प्रत्येक कलाकाराचे स्वागत केले आहे. मात्र, पाकिस्तानच्या सैनिकांनी काही दिवसांपूर्वी जे कृत्य केले त्यामुळे भविष्यात पाकिस्तानी कलाकारांचे भारतात स्वागत नको, अशी स्पष्ट भूमिका ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी रविवारी मांडली.

आशाताईंची प्रमुख भूमिका असलेला ‘माई’ हा हिंदी चित्रपट १ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त सिनेमॅक्स चित्रपटगृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

भोसले म्हणाल्या, गुलाम अली, मेहदी हसन या कलाकारांचे आपण नेहमीच स्वागत केले आहे. काही कलाकारांनी तर आपल्या कारकिर्दीची सुरुवात भारतामधून सुरू केली. आजही अनेक पाकिस्तानी कलाकारांना आपण संधी देत आहोत. परंतु पाकिस्तानी सैनिकांनी काही दिवसांपूर्वी जे कृत्य केले, त्यामुळे मी पुढील काळात पाकिस्तानी गायकांचे स्वागत करणार नाही.

‘माई’ चित्रपट सामाजिक विषयावर बेतलेला आहे, असे सांगताना आशाताई म्हणाल्या, हा चित्रपट करण्यास मी पहिल्यांदा नकार दिला होता. चित्रपटातील व्यक्तीरेखेचे नाव ‘माई’ आहे असे समजल्यावर मी कथा ऐकली. कारण आम्ही आमच्या आईला ‘माई’ म्हणत होतो. मुलांना लहानपणी आई वाढवते, मुले मोठी झाल्यावर आईशी व्यवस्थीत वागत नाहीत, याभोवती ही कथा गुंफण्यात आली आहे, तसेच मुलापेक्षा मुलगी अधिक चांगली असते. यामुळे स्त्री भ्रूणहत्या करू नका, असा संदेश चित्रपटातून देण्यात आला आहे.

दूरचित्रवाणी वाहिन्यांवर मुलाखती देण्याचा सराव असल्याने अभिनयासाठी कॅमेर्‍यासमोर भिती वाटली नाही, असे सांगत त्या म्हणाल्या, गायनापेक्षा अभिनय अधिक सोपा आहे. गायनाला सतत रियाज करावा लागतो. अभिनय त्या तुलनेत कमी कष्टात करता येतो. चित्रपटात 30 वर्षांची स्त्री ते आजी असा माईचा प्रवास दाखविण्यात आहे. पद्मिनी कोल्हापुरे आणि अनुपम खेर यांच्याही या चित्रपटात भूमिका आहेत तर दिग्दर्शन महेश कोडीयाल यांचे आहे, असे त्यांनी सांगितले.