नैनिताल – सरोवरांची भूमी

लेक डिस्ट्रीक्ट ऑफ इंडिया म्हणून ओळख असलेले कुमाऊं जिल्ह्यातील नैनिताल हे हिल स्टेशन हिमालय पर्वतरांगांतील जणू चमकता हिरा आहे. देशी तसेच परेदशी पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेले नैनिताल  सरोवरांनी वेढलेले असून या ठिकाणाचे उल्लेख पुराणांतही येतात. नैनी सरोवरावरून या गावाला नैनिताल हे नांव पडले आहे. ताल म्हणजे सरोवर.

nainital

(फोटो सौजन्य – trawell.in)
दक्ष राजाची कन्या सती हिने शंकराशी विवाह केला. दक्ष राजाने यज्ञ केला तेव्हा शंकराला बोलावले नाही. सतीला हा आपल्या पतीचा अपमान वाटला आणि तिने पेटलेल्या होमात उडी घेतली. शंकराला जेव्हा सतीने होमात उडी घेतल्याचे समजले तेव्हा त्याने तातडीने तिला होमाबाहेर काढले पण ती तोपर्यंत मरण पावली होती. सतीचा जळलेला देह हिमालयात नेत असताना जेथे जेथे तिच्या शरीराचे अवयव पडले ती ६४ ठिकाणे शक्तीपीठे म्हणून हिंदू धर्मियात ओळखली जातात. नैनी सरोवर हे त्यातील एक शक्तीपीठ आहे.
nainital2
सतीच्या जाण्याने सैरभैर झालेल्या आणि अतिशय संतापलेल्या शिवाने याच सरोवराकाठी तांडव नृत्य केले असा समज आहे. येथेच नैना देवी मंदिर आहे. १८८० साली उभारलेले हे मंदिर भूःस्कलनात नष्ट झाले होते ते पुन्हा उभारले गेले. भाविकांची या मंदिरात नेहमीच खूप गर्दी असते. नैनी सरोवर हे सात डोंगरांनी वढलेले असून ते दोन भागात आहे. एका भागाला मिठीताल म्हणतात तर दुसर्या  भागाला म्हणतात तालीताल. आजूबाजूच्या डोंगरावरील दिव्यांचे सायंकाळी या सरोवरात उमटणारे प्रतिबिंब पाहणे म्हणजे नयन नवलोत्सवाची अनुभूती. कारण साडेतीन किलोमीटर लांबीच्या या सरोवरातील पाणी अतिशय शांतस्थिर आहे.

युरोपियन उद्योजक पी.बॅरन याने येथील निसर्ग सौंदर्याला आणि सरोवरांना भुलून येथे पहिले हिल रिसॉर्ट बांधले असे सांगितले जाते. नैनी पिक यालाच चायना पिकही म्हणतात, हे सर्वात उंच शिखर असून त्यांची उंची आहे २६११ मीटर. येथील प्राणीसंग्रहालयही अवश्य भेट द्यावे असेच. येथे आपल्याला हिम चित्ते, गरूड, काळी अस्वले असे अनेक प्राणी पाहता येतात. वेधशाळा, अनेक उत्तमोत्तम संशोधन संस्था आणि उत्कृष्ठ शाळा ही या गांवाची आणखी काही वैशिष्ठे. गावाच्या मध्यभागात असलेल्या मॉल रोडवर रेस्टॉरंट, दुकाने, बँका, हॉटेल्स यांची एकच दाटी आहे. मिठीताल पासून स्नो व्ह्यू पॉईंटवर जाण्यासाठी रोपवे असून २२७५ मीटर उंचीवर असलेल्या या पॉईंटवर रोपवेच्या मदतीने केवळ अडीच मिनिटांत जाता येते.
nainital1
गोथिक शैलीत बांधलेले राजभवन पाहायला हवेच. त्याचबरोबर स्नो व्ह्यू पॉईंटवरून दिसणारी नंदादेवी, त्रिशूळ, नंदा कोट ही हिमालयातील शिखरेही डोळ्यात भरून घ्यायची. २२९२ मीटर उंचीवरच्या टिफिन टॉपला मोटरने जाता येते. नैनितालपासून ६३ किमीवर जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान असून येथे अनेक वन्य प्राणी आहेत. हत्ती, वाघ, चितळ, सांबर, हरणे, नीलगाई, किंग कोब्रा, कस्तुरी मृग, कोल्हे व सुमारे ६०० प्रकारचे पक्षी या राष्ट्रीय उद्यानात आहेत. मुक्तेश्वर हे ५२ किमीवर असलेले ठिकाण आहे.

नैनितालपासून २२ किमीवर असलेले भीमताल हे ठिकाण म्हणजे १७ व्या शतकातला सर्वात मोठा मंदिर समूह असून या ठिकाणाला हे नांव भीमावरून पडले आहे. येथेच धरणही आहे. सात ताल म्हणजे सात सरोवरे. भीमतालपासून अगदी जवळच असलेली ही सरोवरे इंटर कनेक्ट आहेत. भोवती ओक वृक्षांचे जंगल आहे. नल दमयंती, पन्ना, गरूडलेक, व राम सीता लक्ष्मण अशा नावांने ही सरोवरे ओळखली जातात. नौकुचिया सरोवर म्हणजे नऊ कोपरे असलेले सरोवर. हे सर्वात खोल असून एकच दृष्टीक्षेपात हे नऊही कोपरे पाहणारा ढगात अदृष्य होतो असा समज आहे.

हनुमान गढी हे तालीताल पासून साडेतीन किलोमीटरवर असलेले ठिकाण. येथेच हनुमानाने छाती फाडून रामाचे दर्शन घडविले असा समज आहे. येथील सूर्यास्त अतिशय रमणीय आहे मात्र तो पाहताना मन विलक्षण हुरहुरते. नैनितालला जाण्यासाठी उत्तम काळ म्हणजे उन्हाळा किंवा सप्टेंबर ते आक्टोबर.