सारस्वतांच्या स्वागतासाठी यशवंतराव चव्हाण नगरी सज्ज

यशवंतराव चव्हाण साहित्य नगरी ( चिपळूण ): साहित्य संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेवर असलेल्या परशुरामाच्या कुर्‍हाडीचा चा वाद संमेलनाच्या पूर्व संध्येला मिटल्याने येथील साहित्य संमेलन सुरळीत पार पडण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला. सारस्वताच्या स्वागतास यशवंतराव चव्हाण नगरी सज्ज झाली असून केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते संमेलनाचे उदघाटन होणार आहे.

संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेवर परशुरामाच्या परशूचे चित्र छापल्याने संभाजी ब्रिगेड या संघटनेने संमेलन उधळून लावण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला . मात्र गुरुवारी संयोजकांनी नवीन निमंत्रणपत्रिका छापून या वादावर पडदा टाकला आणि संभाजी ब्रिगेडनेही माघार घेतली यामुळे सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.

दरम्यान; संमेलनासाठी चिपळूणकरांनी जय्यत तयारी केली असून संमेलन परिसराला अस्सल कोकणी स्वरूप देण्यात आले आहे. मुख्य सभामंडपासह सर्व सभामंडप, पुस्तक प्रदर्शनाचे स्टॉल्स यांना झोपडीचे बाह्यरूप देण्यात आले आहे. संमेलन स्थळी कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी कोकणातील गाव उभे केले आहे. या कामात १२५ लोकांनी दोन महिने मेहनत घेतली आहे. संमेलनस्थळाला चहुबाजूनी वारली चित्रांचा वेढा आहे. या गावात बारा बलुतेदारांचा जीवनप्रवास उलगडून दाखविण्यात आला आहे. याशिवाय संमेलनाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी छत्रपती शिवाजी महारांजाचा रायगडावरील दरबार आपले लक्ष वेधून घेतो. ग्रामीण कोकणाचे दर्शन घेण्यासाठी शहरातील विविध शाळांतील मुलांनी संमेलनस्थळी गर्दी केली.

मुख्य सभामंडपात पाच हजार लोकांना बसण्याची सोय करण्यात आली असून बाळसाहेब ठाकरे व्यासपीठ पूर्णपणे भगव्या रंगपटामध्ये सजविण्यात आले आहे.