चीनी ऑटो कंपनी गुजराथेत येणार

नवी दिल्ली दि. ४ – चीनची ऑटो क्षेत्रातील बलाढ्य कंपनी ग्रेट वॉल मोटर्स, त्यांचा उत्पादन प्रकल्प गुजराथेत उभारत असल्याचे केंद्रातील वरीष्ठ सरकारी अधिकार्यांकनी सांगितले. गुजराथ भारतातील ऑटो हब म्हणून आता जगभर ओळखले जाऊ लागले आहे.ग्रेट वॉल मोटर्सचे प्रतिनिधी मंडळ कांही महिन्यापूर्वीच गुजराथ भेटीवर आले होते आणि त्यांनी येथील दहेज, साणंद आणि हलोल या औद्योगिक भागाला भेटही दिली असल्याचे समजते.

यापूर्वीच अमेरिकन जायंट जनरल मोटर्स, टाटा मोटर्स यांनी आपले प्रकल्प येथे उभारले आहेत. त्याचबरोबर अमेरिकन फोर्ड, मारूती सुझुकी यांचेही प्रकल्प येथे उभारण्याचे काम सुरू आहे. फ्रेंच प्युजोनेही येथे प्रकल्पासाठी जागा घेतली आहे मात्र युरोपातील आर्थिक संकटामुळे हे काम थोडे रेंगाळले आहे असे समजते. त्यापाठोपाठ आता चीनी मोटर कंपनीही गुजराथेत आपले बस्तान बसवित आहे.