स्टालिनंच माझा राजकीय वारस: करुणानिधी

चेन्नई:आपण अखेरच्या श्वासापर्यंत समाजाची सेवा करीत राहू. माझ्यानंतर कोण असा प्रश्न असेल; तर स्टालिन हे त्याचे उत्तर आहे हे कोणी विसरू नये; या नि:संदिग्ध शब्दात द्रवीड मुन्नेत्र कळघमचे अध्यक्ष करुणानिधी यांनी आपल्या राजकीय वारसाची घोषणा केली. स्टालिन हे करुणानिधी यांचे धाकटे पुत्र आहेत.

डीएमकेच्या नेतृत्वाची धुरा ८८ वर्षीय करुणनिधी यांच्यानंतर कोण सांभाळणार यावरून त्यांचे ज्येष्ठ पुत्र एम. के. अलगिरी आणि स्टालिन यांच्यामध्ये दीर्घ काळ शीतयुद्ध सुरू आहे. मात्र पक्षाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना करुणानिधी यांनी स्टालिन हेच आपल्या पश्चात पक्षाचे नेतृत्व करतील हे स्पष्टपणे जाहीर केले आहे.

करुणानिधी यांनी ही घोषणा केल्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी उत्साहाने घोषणा देऊन स्टालिन यांचे अभिनंदन केले. आत्रा या घोषणेमुळे डी एम के मधील संभ्रमावस्था संपुष्टात येऊन पक्षाला बळ मिळणार की भाऊबंदकीच्या राजकारणात पक्षात दुही माजणार हे येणारा काळंच ठरवेल.