इस्लामाबाद दि. ३- सततचे दहशतवादी हल्ले आणि अशांतता यामुळे आर्थिक हालाखीची परिस्थिती असलेल्या पाकिस्तानने देशात परदेशी गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करावी आणि उद्योग काढावेत यासाठी विशेष विमा सुरक्षा देऊ केली असून त्यानुसार या परदेशी नागरिकांना दोन लाख ते पाच लाख डॉलर्सपर्यंत विमा संरक्षण दिले जाणार आहे. पाकच्या वाणिज्य मंत्रालयाने यासंबंधीचा करार नॅशनल इन्शुरन्स कंपनीशी नुकताच केला असल्याचे वाणिज्य सचिव मुनीर कुरेशी यांनी जाहीर केले आहे. पंतप्रधान रझा परवेझ अश्रफ यांनी मान्यता दिल्यानंतर हा करार करण्यात आला असल्याचे समजते.
मुनीर म्हणाले की अमेरिका, युरो युनियममधील देश आणि ऑस्ट्रेलिया अशा जगातील २७ देशानी त्यांच्या नागरिकांना पाकिस्तानात गुंतवणूक अथवा उद्योग अथवा पर्यटनासाठी जाताना सावधगिरी बाळगावी अशा सूचना दिल्या आहेत. पाकिस्तानात दहशतवादी हल्यांचे वाढलेले प्रमाण आणि परदेशी नागरिकांना केले जात असलेले टार्गेट यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे. त्यामुळे सरकारने पाकिस्तानात गुंतवणूक करू इच्छिणार्यां ना भक्कम विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.
आत्तापर्यंत परदेशी गुंतवणूकदार व उद्योजकांना अशी सुविधा नव्हती किवा कांही केसेसमध्ये त्यासाठी प्रचंड रक्कम प्रिमियम म्हणून त्यांना भरावी लागत होती. मात्र आता नॅशनल इन्शुरन्स कंपनीच्या सहकार्याने परदेशी नागरिकांना ते पाकिस्तानात वास्तव्यास असेपर्यंत दोन लाख ते पाच लाख डॉलर्सपर्यंत विमा सुरक्षा दिली जाणार आहे. यामुळे देशात परदेशी गुंतवणूक वाढण्यास मदत मिळेल अशी आशा आहे असेही मुनीर म्हणाले.