आईवेगळ्या मुलीवर बाप आणि भावाकडून बलात्कार

डोंबिवली: महाराष्ट्राची दुसरी सांस्कृतिक राजधानी हे बिरुद अभिमानाने मिरविणार्‍या डोंबिवली शहरात बाप आणि सख्खा भाऊ यांच्या लैंगिक अत्याचाराला एक युवती सलग वर्षभर बळी पडत असल्याची घटना उघडकीस आली आहे. या नराधम बाप, लेकाला पोलिसांनी जेरबंद केले.

ही युवती डोंबिवली शहरात बाप आणि भावाबरोबर राहत असून तिची आई कुटुंबापासून वेगळी राहत आहे. आईच्या मायेला पारखी झालेल्या या युवतीच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन तिच्या बापाने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर हा प्रकार नियमितपणे सुरू राहिला. तिच्या भावाला या प्रकारची माहिती मिळाल्यानंतर तिला या संकटातून सोडविण्याऐवजी त्यानेहे तिचे लैंगिक शोषण करण्यास सुरुवात केली.

या अत्याचाराला कंटाळून या युवतीने घर सोडून मुंबई गाठली. उपनगरातील एका रेल्वे स्थानकावर ती रडत बसली असताना काही मित्रांनी तिला बघितले त्यांनी अधिक चुकाशे केले असता तिने घरातच आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराची माहिती उघड केली. या मित्रांनी पिडीत युवतीला स्वयंसेवी संस्थेकडे सुपूर्द केले. या संस्थेच्या कार्यकर्त्यांबरोबर पोलीस ठाण्यात जाऊन या युवतीने तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी या नराधमांना अटक केली.