सामूहिक बलात्कार प्रकरणी आरोपपत्र तयार

नवी दिल्ली: धावत्या बसमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी दिल्ली पोलिसांनी ६ आरोपींवर १ हजार पानांचे आरोपपत्र तयार केले असून ते गुरुवारी न्यायालयात सदर केले जाईल; अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी पोलिसांच्या वतीने न्यायालयात केली जाणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

बसमधून आपल्या मित्रासह प्रवास करणाऱ्या २३ वर्षीय युवतीवर दि. १६ डिसेंबर रोजी रात्री ६ नराधमांनी अमानुष बलात्कार केला. त्यानंतर लोखंडी कांबीने मारहाण करून त्या दोघांना बसमधून फेकून दिले. या युवतीचा सिंगापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या निर्घृण प्रकाराने देशभर संतापाची लाट उसळली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी तयार केलेल्या आरोपपत्रात ३० साक्षीदारांचा समावेश करण्यात आला आहे. या आरोपपत्रात आरोपींवर बलात्कार, खून आणि अन्य आरोप ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक आरोपीचा गुन्ह्यात कशाप्रकारचा सहभाग आहे; याची सविस्तर माहिती आरोपपत्रात देण्यात आली आहे.

या गुन्ह्याचा संपूर्ण घटनाक्रम, पिडीत युवतीवर करण्यात आलेले उपचार, तिला सिंगापूर येथील रुग्णालयात हलविण्याचा निर्णय आणि तिचा मृत्यू याबाबत सविस्तर माहितीचा समावेश आरोपपत्रात करण्यात आला आहे. आरोपींमध्ये एका १७ वर्षीय युवकाचा समावेश असल्याने त्याच्याबाबत स्वतंत्र अहवाल बाल सुधार न्यायालयाला सदर करण्यात येणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.