गुरुवारी भारत बंदचे आवाहन

नवी दिल्ली: धावत्या बसमध्ये सामुहिक बलात्कार प्रकरणाचा निषेध करण्यासाठी आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी काटेकोर उपाय योजले जावे या मागणीसाठी गुरुवारी दि. ३ जानेवारी रोजी भारत बंदचे आवाहन बिगर राजकीय युवा वर्गाने केले आहे.

दरम्यान; सामुहिक बलात्कारात बळी पडलेल्या युवतीच्या कुटुंबाला १५ लाख रुपयांची आर्थिक मदत आणि कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीत सामावून घेण्याचे दिल्ली राज्य शासनाने जाहीर केले आहे. ही युवती फिजिओथेरेपीचे उच्चशिक्षण घेत होती. तिच्या शिक्षणासाठी तिच्य पालकांनी आपला जमिनीचा तुकडा विकला आहे.

सामुहिक बलात्काराची बळी ठरलेल्या युवतीच्या पार्थिवावर रविवारी शोकाकुल वातावरणात आणि कडेकोट बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. या युवतीच्या आईला बसलेल्या मानसिक धक्क्यामुळे तिची प्रकृती नाजूक बनली असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत.

सिंगापूर येथे रवाना करण्यात आलेल्या खास विमानातून पीडीत युवतीचे पार्थिव रविवारी पहाटे दिल्ली येथे आणण्यात आले. पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी या युवतीला श्रद्धांजली अर्पण केली. सुमारे अर्धा तास थांबून त्यांनी युवतीच्या नातलगांचे सांत्वन केले. पोलीस आणि अन्य सुरक्षा यंत्रणांच्या २४ गाड्या आणि २ बसेसच्या बंदोबस्तात या युवतीचे पार्थिव रुग्णवहिएतॊन तिच्या निवासस्थानी आणण्यात आले. त्या ठिकाणी पार्थिव दीड तास ठेवण्यात आले. मात्र कडक बंदोबस्तामुळे तिच्या शेजाऱ्यांना देखील अंत्यदर्शनाची परवानगी देण्यात आली नाही.

त्यानंतर पार्थिव स्मशानभूमीत आणण्यात आले. दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित, केंद्रीय गृहराज्यमंत्री आरपीएन सिंह यांनी या ठिकाणी अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर शोकाकुल वातावरणात पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Leave a Comment