हिलरी क्लिंटन रूग्णालयात

वॉशिंग्टन दि.३१ – अमेरिकेच्या परराष्ट्र सचिव हिलरी किलंटन यांना सोमवारी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या रक्तात गुठळी झाल्याचे निदान डॉकटरांनी केले आहे.

याविषयी अधिक माहिती देताना उपपरराष्ट्र सचिव व हिलरी यांचे प्रवक्ते फिलिप राईन्स म्हणाले की गेल्या महिन्यापासून हिलरी यांना बधीरता आल्याचा त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांना तपासण्या करण्यासाठी प्रेसबायटेयिन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सीटी स्कॅन केल्यानंतर त्यांच्या रक्तात गुठळी झाल्याचे त्यांच्यावर उपचार करणार्या. डॉक्टरांच्या पथकाला जाणवले. ही गुठळी विरघळण्यासाठी हिलरी यांच्यावर औषधोपचार सुरू असून ४८ तास सतत त्यांची प्रकृती मॉनिटर केली जाणार आहे.

या महिन्यातच ६५ वर्षीय हिलरी यांना पोटात संसर्ग झाल्याचा त्रास झाला होता. त्यामुळे त्यांनी संपूर्ण डिसेंबर महिना घरातूनच कामकाज पाहिले होते. पुढच्या आठवड्यात त्या कामावर पुन्हा रूजू होतील असे सांगितले गेले होते. मात्र आता त्यांना पूर्ण बरे वाटल्याशिवाय त्या कामावर येणार नाहीत तसेच त्यांना अन्य जे त्रास होत आहेत तेही या गुठळीमुळेच होत आहेत का याची पूर्ण खात्री करून घेऊनच त्यांच्यावर कोणते उपचार करायचे याचा निर्णय डॉक्टर घेणार आहेत असेही समजते.