जयपाल रेड्डी मंत्रीपदाचा राजीनामा देणार?

नवी दिल्ली दि.३१- आघाडी केंद्र सरकारातील विज्ञान तंत्रज्ञान मंत्री जयपाल रेड्डी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. स्वतंत्र तेलंगणाच्या मागणीसाठी केल्या जात असलेल्या आंदोलनाचे नेतृत्त्व आपणच करायला हवे असे त्यांना वाटते आहे आणि त्यामुळेच ते मंत्रीपद सोडून आंदोलनात सक्रीय सहभागी होणार आहेत असे त्यांचे निकटवर्ती खासदार गुथा सुखेंद्र रेड्डी यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्रीमंडळात फेरबदल झाले तेव्हा जयपाल रेड्डी यांच्याकडून पेट्रोलियम खाते काढून घेण्यात आले होते आणि विज्ञान तंत्रज्ञान खात्याचा कार्यभार त्यांच्यावर सोपविण्यात आला होता. त्यामुळेही रेड्डी नाराज होते. कारण सध्याचे खाते पेट्रोलियम खात्यापेक्षा कमी महत्त्वाचे आहे असे त्यांना वाटत होते. स्वतंत्र तेलंगणाच्या आंदोलनाला त्यांनी सततच पाठिबा दिला आहे मात्र या आंदोलनाची तीव्रता कमी होत चालल्याची त्यांची भावना होती. त्यामुळे आंदोलनाची तीव्रता कायम राखण्यासाठी आपल्यालाच आंदोलनाचे नेतृत्त्व करणे भाग आहे असे त्यांना वाटते आहे. दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी तेलंगण खासदारांची वर्दळ वाढली असून सतत चर्चा सुरू आहेत. त्यामुळेच कोणत्याही क्षणी रेड्डी मंत्रीमंडळातून बाहेर पडतील असे त्यांचे निकटवर्ती सांगत आहेत.

Leave a Comment