नागपूर: स्वत:च्या मुलीवर सतत दोन वर्ष बलात्कार करणारा बाप आणि तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेणारा आतेभाऊ या दोघांना नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. साक्षात पालकांकडूनंच होणाऱ्या अत्याचाराच्या प्रकारांमुळे महिलांच्या सुरक्षिततेच्या ऐरणीवर आलेल्या प्रश्नाचे जटील स्वरूप यामुळे समोर येत आहे.
पीडीत युवतीचा बाप तिच्यावर सतत दोन वर्ष बलात्कार करीत होता. बापाच्या अत्याचाराला वैतागून ती आपल्या आतेभावाच्या आश्रयाला गेली. मात्र त्यानेही आपल्या मामेबहिणीच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन तिच्यावर बलात्कार केला.
या सततच्या आणि प्रत्यक्ष बाप अणि भावाकडून होणाऱ्या अत्याचारामुळे या युवतीला प्रचंड मानसिक धक्का बसला. या धक्क्यातून सावरण्यासाठी तिला मानसोपचारतज्ञांची मदत घ्यावी लागली. मन:स्थिती सामान्य झाल्यावर तिने गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी या दोघा नराधमांना अटक केली आहे.
रस्त्यावर, समाजात, कार्यालयात आणि शाळा, महाविद्यालयात असुरक्षित असलेल्या महिला घरातही सुरक्षित नसल्याची धक्कादायक बाब अशा घटनांमुळे अधोरेखित होत आहे.