कराचीत हिंसाचाराचा पुन्हा उद्रेक – सात ठार

कराची दि.२६- पाकिस्तानची आर्थिक राजधानी असलेल्या कराची शहरात पुन्हा हिंसाचाराच उद्रेक झाला असून मंगळवारी त्यात सात जणांचा बळी गेला. रविवारपासून सुरू असलेल्या या हिंसाचारात बळी गेलेल्यांची संख्या २६ वर गेली आहे.

मंगळवारच्या उद्रेकात पोलिसासह सात जण ठार झाले असून धर्मगुरू मौलाना औरंगजेब फारूकी हे गंभीर जखमी झाले आहेत. त्याच्या मोटारीवर सशस्त्र हल्लेखोरांनी चढविलेल्या हल्ल्यात मौलाना गंभीर जखमी झाले तर त्यांचा चालक व तीन सुरक्षा रक्षक ठार झाले. मोटरसायकलवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी मोतीमहल या दाट लोकवस्तीच्या भागातच मौलानांच्या गाडीवर हल्ला केला. या हल्ल्याची खबर वार्यारच्या वेगाने पसरली आणि शहराच्या अन्य भागातही हिंसाचाराचा उद्रेक झाला असे समजते.

पाकिस्तानचे अध्यक्ष आसीफ अली झरदारी यांनी हल्लेखोरांविरूद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. सोमवारी झालेल्या हिंसाचारात दहा जणांचा बळी गेला आहे.