मास्को दि.२४- दोन वर्षांपूर्वी भगवद्गीतेवर बंदी आणण्याचा प्रकार घडल्यानंतर आता रशियात मास्को येथे असलेले एकमेव हिंदू मंदिर पाडण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून इस्कॉनचे हे मंदिर आहे. जानेवारी २०१३ त हे मंदिर जमीनदोस्त केले जाणार असल्याचे मंदिराच्या विश्वस्तांनी सांगितले. अर्थात याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने स्वतः लक्ष घातले असून रशियाचे अध्यक्ष ब्लादीमीर पुतीन आजच भारत भेटीवर आले आहेत त्यांच्याबरोबर होणार्या चर्चेत या मंदिराचा प्रश्नही चर्चेला येईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
भारतीय राजदूत अजय मल्होत्रा या संदर्भात अधिक माहिती देताना म्हणाले की या मंदिराला ताप्तुरती परवानगी देण्यात आली होती व ती ३१ डिसेंबरला संपते आहे. मात्र आम्ही वेदिक कल्चरल सेंटरची उभारणी पूर्ण होईपर्यंत हे मंदिर कायम ठेवावे अशी विनंती केली आहे. मास्कोचे महापौर सर्जे सोबयनिन यांनी मुदतवाढ देण्यास नकार दिला आहे. इतकेच नव्हे तर मास्कोत कायमस्वरूपीर मंदिर होऊ नये असाही त्यांचा आग्रह आहे.
विशेष म्हणजे दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित आणि व मास्कोचे माजी महापौर युरी लुझकोव्ह यांनी २००६ साली केलेल्या चर्चेतून दोन्ही शहरांत सांस्कृतिक सहकार्याचे प्रतीक निर्माण करण्याचे ठरविले गेले होते.त्यानुसार दिल्लीत रशियन ऑर्थोडॉक्स चर्चसाठी जागा देण्याचे व मास्कोत मंदिरासाठी जागा देण्याचे ठरविले गेले होते. आजच्या एकदिवसीय भेटीवर आलेले अध्यक्ष पुतीन या चर्चसाठी जागा देण्यासंबंधी चर्चा करणार आहेत मात्र त्याचवेळी मास्कोतील मंदिरावर मात्र कुर्हायड पडणार आहे. विशेष म्हणजे याच आर्थोडॉक्स चर्चने मंदिरासाठी जागा देऊ नये यासाठी निदर्शने केली आहेत व त्यामुळेच सरकारने सध्याचे मंदिर पाडल्यास त्यासाठी दुसरी जागा देण्यास टाळाटाळ चालविली आहे.