लंडन दि. १४ – पृथ्वीवरची सर्वात मौल्यवान खोली कोणती असेल असा तुम्हाला प्रश्न पडला असेल, तर त्याचे उत्तर आहे बँक ऑफ इंग्लंड मधील अतिसुरक्षित सुरक्षा व्हॉल्ट. या व्हॉल्टमध्ये जमिनीपासून छतापर्यंत नुसत्या सोन्याच्या चीपा असून त्याची किंमत आहे १९७ अब्ज पौंड आणि वजन आहे अंदाजे ४६०० टन. बँक ऑफ इंग्लंडच्या प्रचंड तळघरात असलेल्या या व्हॉल्टमध्ये १०० वर्षांहून अधिक काळ हे सोने जतन केले गेले आहे . फरगॉटन गोल्ड असाच त्याचा उल्लेख केला जातो.
ब्रिटनकडे सध्या ३१० टन सोन्याचा साठा म्हणजे राष्ट्रीय राखीव साठा आहे. मात्र बँक ऑफ इंग्लंडच्या तळघरात आहे तब्बल ४६०० टन सोने. सोन्यात गुंतवणूक करणारे गुंतवणूकदारांचे हे सोने आहे. यातील प्रत्येक गोल्ड बारवर कारच्या नोंदणी क्रमांकाप्रमाणेच स्वतंत्र नोंदणी नंबर आहेत. त्यामुळे जेव्हा ग्राहक सोन्याची खरेदी करतो तेव्हा त्याला ते सोने प्रत्यक्ष घरी न्यावे लागत नाही तर त्या बारच्या नोंदणी क्रमांक किंवा ओळख क्रमांक फक्त त्याच्या अकौंटवर ट्रान्स्फर केला जातो. १०० वर्षांहून अधिक काळ याच पद्धतीने या सोन्याचे व्यवहार केले जात आहेत मात्र प्रत्यक्षात ते व्हॉल्ट मधून बाहेर काढण्याची गरजच आत्तापर्यंत पडलेली नाही असेही समजते.