वॉशिग्टन दि.१४ – यूकेसाठी अमेरिकेच्या अॅम्बॅसिडर म्हणून कार्यरत असलेल्या सुसान राईस यांनी सेक्रेटरी ऑफ स्टेट पदासाठी माघार घेत असल्याचे आणि या पदासाठी आपल्या नावांचा विचार केला जाऊ नये असे पत्र राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना पाठविले आहे. ओबामा यांनीही राईस यांचा निर्णय मान्य केला आहे असे वृत्त आहे.
अमेरिकेच्या सेक्रेटरी ऑफ स्टेटवर सध्या हिलरी किलंटन आहेत. मात्र त्यांनी ओबामा यांची राष्ट्राध्यक्षपदाची पहिली टर्म संपेल तेव्हा म्हणजे जानेवारीत हे पद सोडणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यामुळे देशाच्या या टॉप डिप्लोमॅटिक पदासाठी राईस यांनाच ओबामा यांची पहिली पसंती होती. मात्र रिपब्लिकन सिनेटर्सनी राईस यांच्या नावाला कडवा विरोध करणार असल्याचे जाहीर केल्याने राईस यांनी अगोदरच माघार घेतली आहे.
यासंबंधी राष्ट्राध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात राईस म्हणतात की आपण या पदासाठी माझा विचार केलात हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. या पदावर पूर्ण क्षमतेने काम करून मी राष्ट्रकार्यास हातभार लावू शकेन याचा मला पूर्ण आत्मविश्वासही आहे. मात्र रिपब्लिकन सिनेटरनी विरोध करण्याचा निर्णय जाहीर केला आहे त्यामुळे ही प्रोसेस विनाकारण लांबेल, त्यात अडथळे येतील आणि परिणामी खर्चही अधिक होईल. त्यामुळे आपण माझे नांव या पदासाठी सुचवू नये अशी विनंती आहे.