सोने पुन्हा भाव खाणार

मुंबई दि. २७- येत्या वर्षअखेर सोन्याच्या किमती ३५ हजार रूपये प्रति तोळ्याचा टप्पा पार करतील असा अंदाज सराफ व्यावसायिक व्यक्त करत आहेत. काल सोन्याच्या भावाने आत्तापर्यंतचा उच्चांक नोंदवत ३३ हजारांची पातळी ओलांडली आहे. वर्षाच्या सुरवातीला २७ हजार रूपये तोळा असणार्याह सोन्याचे भाव दहा महिन्यात तब्बल ६ हजारांनी वाढले असून ही वाढ आणखी कांही काळ अशीच सुरू राहील असा अंदाज वर्तविला जात आहे.

जागतिक बाजारात वास्तविक सोन्याचे दर उतरले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात हे दर १९२१ डॉलर्स वरून १७५१ डॉलर्स प्रती औंसावर आले आहेत. मात्र रूपयातील घसरण आणि भारतातील वाढती आयात आणि ग्राहक मागणी यामुळे भारतात सोन्याचे दर भाव खाऊन आहेत असे तज्ञांचे मत आहे. जगभरातील मध्यवर्ती बँका सोने खरेदीला प्राधान्य देत आहेत. यूरो झोनमधील अनिश्चतता सोन्यातील गुंतवणूक वाढण्यास कारणीभूत ठरत असल्याचे रेलिगेअर सिक्युरिटीचे अध्यक्ष जयंत मंगलीक यांचे म्हणणे आहे.

भारतात सध्या लग्नसराईचा मोसम असल्याचे सोने चांदीला मागणी आहे. त्यामुळे वर्षअखेर सोनेदर ३५ हजाराची पातळी ओलांडतील असा अंदाज आहे. मात्र एकदा मागणी कमी झाली की नजीकच्या काळात हे दर पुन्हा थोडे उतरतील असे सराफ व्यावसायिकांचे म्हणणे आहे.