सर्वपक्षीय बैठक निष्फळ; संसद ठप्पच

नवी दिल्ली: रिटेल क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणुकीच्या मुद्द्यावरून ठप्प झालेले संसदेचे कामकाज सुरळीत व्हावे यासाठी आयोजित करण्यात आलेली सर्वपक्षीय बैठक निष्फळ ठरली. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटकपक्षांसह दोन्ही कम्युनिस्ट पक्ष मतदानाच्या मागणीवर ठाम आहेत; तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी मतदान न घेता चर्चा करण्याबाबत आग्रही आहेत.

रिटेल क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणुकीच्या मुद्द्यावरून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचे कामकाज ठप्प आहे. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीतूनही सर्वमान्य तोडगा निघू शकला नाही.

थेट विदेशी गुंतवणुकीच्या मुद्द्यावर लोकसभेत नियम १८४ आणि राज्यसभेत नियम १६७ अंतर्गत चर्चा आणि त्यानंतर मतदान घेण्यात यावे; या मागणीवर भाजप ठाम असून याबाबत कोणतीही तडजोड होऊ शकत नाही; असे लोकसभेतील विरोधीपक्ष नेत्या सुषमा स्वराज यांनी सांगितले.

रालोआतील आपल्या घटक पक्षांना मतदानाला विरोध करण्याबाबत सहमत करण्यास काँग्रेसला यश आले आहे. आम्हाला चर्चा हवी आहे. मतदान व्हावे की नाही याचा निर्णय आम्ही सभागृहाच्या अध्यक्षांवर सोडला आहे; अशी भूमिका समाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी पक्ष या सरकारला बाहेरून पाठींबा देणार्या पक्षांनी घेतली आहे. थेट विदेशी गुंतवणुकीच्या मुद्द्यावर मतदान झाल्यास याच पक्षांच्या सदस्यांची मते निर्णायक ठरू शकतात.