भारतात ८०० टन सोन्याची आयात अपेक्षित

नवी दिल्ली दि. २६ – भारतात या वर्षात सोन्याची आयात ८०० टनांवर जाईल असा अंदाज वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने वर्तविला असून ही आयात गतवर्षीच्या तुलनेत १७० टनांनी कमी असल्याचेही सांगण्यात आले आहे. गेल्या वर्षात म्हणजे २०११ सालात भारतात ९६९ टन सोने आयात केले गेले होते. ग्राहकांकडून असलेली प्रचंड मागणी हीच सोने आयात वाढण्याचे मुख्य कारण होते असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

यंदाच्या वर्षात पावसाचे कमी राहिलले प्रमाण, महागाई, सराफ व्यावसायिकांचा संप आणि सोन्याची दरवाढ यामुळे पहिल्या दोन तिमाहीत सोन्याला मागणी कमी होती मात्र गेल्या दोन महिन्यात सणसमारंभ आणि लग्नसराईमुळे सोन्याची मागणी पुन्हा वाढली असल्याचे वर्ल्ड गोल्ड कौन्सिलचे अमरेश आचार्य यांनी सांगितले. ते म्हणाले २०११ हे सोने खरेदीचे आगळे वर्ष म्हणायला हवे. या वर्षात मागणीही खूप होती व त्यामुळे आयातही मोठी होती.

यंदा सोने आयातीत चीनने आघाडी घेतली असून आत्ता चीनच्या तुलनेत भारताची आयात केवळ २० टनांनी जास्त आहे. मात्र सोन्याच्या दागिन्यांना चीनमध्ये प्रचंड मागणी असल्याने वर्षअखेर भारताला मागे टाकून चीन आयातीत आघाडी घेईल याची खात्री तज्ञ व्यक्त करत आहेत. भारत आणि चीन दोन्ही देशांत इटीएफ फंडनाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे मात्र त्यासाठी ग्राहकांमध्ये अजून जागृती होणे गरजेचे आहे असेही तज्ञांचे म्हणणे आहे.