नवी दिल्ली: इंडिया अगेन्स्ट करप्शनचे अरविंद केजरीवाल यांनी आपल्या नवीन राजकीय पक्षाचे ‘आम आदमी पक्ष’ असे नामकरण केले आहे. आपला पक्ष सत्तेवर आल्यास आपण लोकपाल विधेयक संमत करू. महागाई हटवू; अशी ग्वाही केजरीवाल यांनी दिली. ‘मी आम आदमी आहे आणि मी देशात पूर्ण स्वातंत्र्य प्रस्थापित करीन; अशी उद्घोषणाही त्यांनी केली.
आपल्या पक्षाचे नामकरण करण्यासाठी केजरीवाल यांनी आपल्या निवडक ३०० कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली आहे. ही बैठक सुरू असतानाच त्यांनी आपल्या पक्षाचे नाव जाहीर केले. या बैठकीत पक्षाची कार्यकारिणी निवडली जाणार आहे. या कार्यकारिणीत ४० सदस्य असतील. या पक्षाला कोणीही अध्यक्ष किंवा साराचीतानीस असणार नाही. राष्ट्रीय कार्यकारिणीच सर्व प्रकारचे निर्णय घेईल. राष्ट्रीय संयोजक कार्यकारिणीचे नेतृत्व करेल. आपल्या पक्षात महिला आणि युवक, विद्यार्थ्यांना महत्वाचे स्थान असेल; असे केजरीवाल यांनी जाहीर केले आहे.
केजरीवाल यांचा पक्ष समता आणि अखंडतेचा समर्थक असल्याने टीम अण्णा सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत या पक्षाला पाठींबा देईल; असे टीम अण्णाच्या ज्येष्ठ सदस्य किरण बेदी यांनी हैदराबाद येथे जाहीर केले आहे.