पालघरच्या पोलिसांवर खात्यांतर्गत कारवाईचा प्रस्ताव

मुंबई: शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर पुकारण्यात आलेल्या बंदच्या विरोधात सोशल मिडीयाद्वारे प्रतिक्रिया देणार्या युवतींची अटक टाळता येण्यासारखी होती; असा निर्वाळा या प्रकारणाची चौकशी करणारे कोकण विभागाचे महानिरीक्षक सुखविंदर सिंग यांनी आपल्या अहवालात दिला आहे. ही कारवाई करणाऱ्या पोलिसांवर खात्यांतर्गत कारवाई करावी; असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर फेसबुकवर बंदचा निषेध व्यक्त करणारा मजकूर पालघर येथील एका युवतीने पोस्ट केला आणि दुसऱ्या एका युवतीने त्याचे समर्थन केले. या पोस्टचा निषेध करून शिवसैनिकांनी या युवतींवर कारवाईची मागणी केली. त्यानुसार पालघर पोलिसांनी त्यांना अटक केली.

पोलिसांनी या युवतींवर दाखल केलेला सामाजिक अथवा धार्मिक भावना दुखावण्याचा गुन्हा अयोग्य असून तो मागे घेण्यात यावा; अशी सूचनाही अहवालात करण्यात आली आहे.

मात्र त्यांना करण्यात आलेली अटक ही त्या युवतींचे संरक्षण करण्यासाठीच असल्याचा स्थानिक पोलिसांचा दावा असल्याचे सिंग यांच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. मात्र ही अटक टाळणे शक्य होते; असेही सिंग यांनी अहवालात नमूद केले आहे.

या प्रकरणावरून पोलीस आणि गृहविभागाला मोठ्याप्रमाणावर टीकेला सामोरे जावे लागले आहे. अखेर गृहमंत्री आर. आर. पाटील यांना पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यापूर्वी विधी सल्लागारांचा सल्ला घेणे अनिवार्य असल्याचे आदेश देणे भाग पडले आहे.

Leave a Comment