बिलावलवर पाकिस्तान पीपल्सच्या प्रचाराची धुरा

इस्लामाबाद दि.२४ – पाकिस्तानचे अध्यक्ष असीफ अली झरदारी यांनी त्यांचा मुलगा बिलावल याच्या राजकीय कारकीर्दीची सुरवात पुढील वर्षात होणार्याय सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी सुरू करून देण्याचा निर्णय घेतला असून सध्या त्याला पाकिस्तान पिपल्स पार्टीचे प्रमुखपद दिले जाणार आहे. पाकिस्तानी कायद्याप्रमाणे २५ वर्षे पूर्ण होईपर्यंत निवडणूक लढविता येत नाही. बिलावल सध्या २४ वर्षाचाच असून तो सप्टेंबर २०१३ मध्ये २५ वर्षे पूर्ण करेल मात्र पाकिस्तानात निवडणुका मे २०१३ मध्येच होत आहेत. त्यामुळे या निवडणुकात प्रचारासाठी त्याच्याकडे महत्त्वाचे पद असणे गरजेचे मानले जात आहे.

पाकिस्तान पिपल्स पार्टीच्या एका वरीष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार भारतात जसे नेहरू गांधी परिवाराची गरज पक्षाला आहे तोच प्रकार पाकिस्तानानही असून येथे भुट्टो परिवारातील सदस्य असणे गरजेचे असते. त्यामुळे कुणाला आवडो न आवडो आगामी निवडणूकात बिलावल, त्याच्या बहिणी असीफा आणि बिश्ववार यांना प्रचारात उतरविले जाईल. अगदी झरदारी सुद्धा या निर्णयाला आव्हान देऊ शकणार नाहीत.

बेनझीर भुटटो यांची हत्या झाल्यानंतर भुट्टो परिवाराबद्दल असलेल्या सहानुभूतीत भरच पडली आहे. त्यातून त्यांची २२ वर्षीय कन्या बिश्तवार हिला राजकारणात रस नाही आणि धाकटी असीफा अजून खूपच लहान आहे. त्यामुळे सध्या बिलावलला पर्याय नाही हे खरेच आणि विशेष म्हणजे त्याला राजकारणात रसही आहे. भुट्टो परिवाराकडे मतदारांना आकर्षित करण्याची जी ताकद आजही आहे, त्याचा फायदा बिलावलच्या रूपाने पाकिस्तान पिपल्स पार्टीला नक्कीच मिळणार आहे असेही मत त्यांनी व्यक्त केले.