फ्रँकफर्ट दि. २४ – जर्मन चीपमेकर कंपनी क्वायमोंडने त्यांची ७५०० पेटंट विक्रीसाठी बाजारात आणली असल्याचे कंपनीचे प्रशासक मायकेल जेफ यांनी जाहीर केले आहे. इतक्या मोठ्या संख्येने पेटंट विक्रीला बाजारात येण्याचा हा पहिलाच प्रसंग असून यापूर्वी इस्टमन कोडॅक कंपनीने त्यांच्याकडील बौद्धिक संपदा हक्कांची अशीच विक्री केली होती.
क्वायमोंडची ७५०० पेटंट विक्रीला
याविषयी माहिती देताना प्रशासक मायकेल म्हणाले की गेल्या काही वर्षात प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या विरोधात वापरण्यासाठी तंत्रज्ञान कंपन्या अब्जावधी डॉलर्सची पेटंट खरेद्या करत आहेत. २००६ मध्ये इनफिनिऑन कंपनीतून फूटून वेगळी झालेल्या क्वायमोंड कंपनी २००९ सालात अडचणीत आली होती. सेमी कंडक्टर, संगणक, आणि संगणक उद्योगातील अनेक बौद्धिक संपदा हक्क कंपनीकडे आहेत. कंपनीला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी कंपनीने ७५०० पेटंट विक्रीला आणली आहेत मात्र त्यांची अपेक्षित किंमत मात्र जाहीर केलेली नाही.
