नवी दिल्ली: रिटेल क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणुकीच्या मुद्द्यावरून सरकारवर अविश्वासदर्शक ठराव मांडण्याच्या विषयावर तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बेनार्जी एकाकी पडण्याची चिन्ह आहेत. अविश्वासदर्शक ठरावाबद्दल भारतीय जनता पक्ष मूग गिळून आहे; तर डाव्यांनी हा ठराव अव्यवहार्य असल्याचे थेट जाहीर केले आहे.
आगामी हिवाळी अधिवेशनात थेट विदेशी गुंतवणुकीच्या मुद्द्यावरून अविश्वासदर्शक ठराव मांडण्याबाबत ममता आग्रही आहेत. भाजप आणि एकूणच राष्ट्रीय लोकशाही आघाडी या ठरावाला पाठींबा देतील; अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र भाजप या ठरावाबाबत फारसे उत्सुक नसल्याचे दिसून येत आहे.
हिवाळी अधिवेशनातील रणनीती निश्चित करण्यासाठी भाजपची ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीत अविश्वासदर्शक ठरावावर चर्चाही झाली. मात्र रालोआच्या बैठकीत सहयोगी पक्षांशी चर्चा करून त्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे पक्ष प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी बैठकीनंतर सांगितले. मात्र पक्षाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप अविश्वास ठरवाऐवजी थेट विदेशी गुंतवणुकीच्या विषयात सभागृहात चर्चा घडवून सरकारची कोंडी करण्याच्या विचारात आहे. अविश्वास ठरावावर होणार्या मतदानात सरकार सहज तरून जाईल; अशी खात्री भाजप नेत्यांना आहे.
कम्युनिस्ट पक्षाचे सर्वोच्च नेते प्रकाश करात यांनीही हा ठराव मांडणे व्यवहार्य ठरणार नसून सरकार आपले बहुमत सिद्ध करण्यात सहज यशस्वी होईल. त्यामुळे कम्युनिस्ट पक्ष या ठरावाच्या बाजूने आपले मत टाकणार नाही; असे करत यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे.