निवडणूक आयोगाकडे दाद मागणार काँग्रेस

अहमदाबाद दि.१९ – जगात प्रथमच थ्रीडी तंत्रज्ञानाचा वापर करून निवडणूक प्रचार करण्याचा विक्रम गुजराथचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र या हायटेक प्रचारासाठी मोदींनी केलेल्या खर्चाच्या मुद्द्यवरून निवडणूक आयोगाकडे दाद मागण्याच्या पवित्र्यात काँग्रेस आहे.

रविवारी मोदी यांनी सुरू केलेल्या या हायटेक प्रचारात त्यांचे गांधीनगर येथील स्टुडिओतून केलेले भाषण एकाचवेळी चार शहरांत प्रसारित करण्यात आले.

गांधीनगर येथून केलेले भाषण अहमदाबाद, बडोदा, राजकोट आणि सुरत या चार शहरांत एकचवेळी नागरिकांना ऐकता व पाहता आले. त्यासाठी मोठे स्क्रीन उभारण्यात आले होते. या उपक्रमासाठी मोदींनी एका प्रसारणाला ५ कोटी रुपये खर्च केल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अर्जुन मोढवाडीया यांनी केला आहे.

गुजरात सरकारने जनकल्याणासाठी वापरण्याचा निधी या प्रचार मोहिमेवर खर्च केल्याचा आरोप करून या उत्पनाचा स्त्रोत तपासण्याची विनंती निवडणूक आयोगाला करण्यात येईल; असे काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले.

प्रत्यक्षात मोदी आपली आश्वासने पूर्ण करण्यास असमर्थ ठरले आहेत. त्यामुळे जनतेला भुरळ घालण्यासाठी ‘धन- दान’ उपक्रमाच्या नावाखाली जनतेकडून वसूल करण्यात आलेला निधी या हाय टेक प्रचारासाठी वापरण्यात येत असल्याचा मोढवाडीया यांचा दावा आहे.

Leave a Comment