लंडन दि.१७ – लंडनची राणी एलिझाबेथ हिला टॅब्लेट संगणक भेट म्हणून देण्यात येणार असून हा टॅब्लेट रॉयल कलेक्शनमध्ये समाविष्ट केला जाणार असल्याचे सूत्रांकडून समजते. टच स्क्रिनसह असलेला सॅमसंग गॅलॅक्सी नोट हा टॅब्लेट राणीला देण्यात येणार असून त्यात लोड करण्यासाठी १५० गिगाबाईटचा डेटा जमा झाला होता मात्र या टॅब्लेटची तितकी क्षमता नसल्याने त्यातील निवडक माहितीच यात लोड करण्यात येणार आहे.
राणी एलिझाबेथ गेली साठ वर्षे हे पद भूषवित आहे. या साठ वर्षांतील तिच्या सबंधातील आठवणी नागरिकांनी व्हिडीओ, फोटेा, टेक्स्ट स्वरूपात पाठवाव्या असे आवाहन करण्यात आले होते.त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि सुमारे ८० हजार नागरिकांनी अशा आठवणी पाठविल्या. मात्र टॅब्लेटची स्टोअरिंग क्षमता लक्षात घेऊन अखेर जज नेमून त्यातून कांही निवडक आठवणीच फायनल केल्या गेल्या. हे काम करण्यासाठी रॉयल फोटोग्राफिक सोसायटीचे महासंचालक आणि रॉयल लायब्ररीयन यांनीही जज म्हणून काम केले. त्यातून केवळ ६० आठवणी निवडण्यात आल्या असे समजते.
अर्थात जमा झालेल्या ८० हजार आठवणीं ऑनलाईन माध्यमातून सर्वांना पाहता येणार आहेत आणि डायमंड रि-कलेक्शन या नावाने हा डेटा ऑनलाईन उपलब्ध करून दिला जात आहे. ६६ देशांतील ३७ हजारांहून अधिक नागरिकांनी राणीच्या आठवणी पाठविल्या असून त्यात ऑलिंपिक विजेते ऑक्टपिस्टोरियर या वृद्धपासून ते प्रिन्स हॅरीपर्यंत अनेकांचा समावेश आहे.
राणीच्या रॉयल कलेक्शनसाठी प्रथम अॅपलच्या आयपॅडचा विचार केला गेला होता मात्र नंतर तो बदलून सॅमसंगचा गॅलॅक्सी नोट टॅब्लेट फायनल केला गेला असेही सांगण्यात आले. विंडसर कॅसल मध्ये असलेल्या या रॉयल कलेक्शनमध्ये पीसी, डीव्हीडी यांचाही समावेश यापूर्वीच करण्यात आला आहे.