न्यूयॉर्क,१४ नोव्हेंबर-उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणार्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होत असली, तरीही शिक्षणासाठी अमेरिकेला जाण्याची भारतीयांची ’क्रेझ’ कमी होत आहे. ’इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल एज्युकेशन’च्या अहवालातून ही बाब समोर आली आहे. तथापि चीनमधून अमेरिकेला जाणार्या विद्यार्थ्यांच्या संख्येत तब्बल २३ टक्क्यांनी वाढ झाली असून सौदी अरेबियातूनही सरकारी पाठबळावर अमेरिकी विद्यापीठांमध्ये प्रवेश घेणार्यांची संख्या वाढली आहे.
२०११ -१२ या शैक्षणिक वर्षासाठी अमेरिकी विद्यापीठांमध्ये प्रवेश घेणार्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत गतवर्षीच्या तुलनेत जवळपास चार टक्क्यांनी घट झाली आहे. अमेरिकेत जाणार्या भारतीय विद्यार्थ्यांपैकी जवळपास ६० टक्के विद्यार्थी इंजिनिअरिंग, गणित आणि संगणकशास्त्र शाखेतील आहेत. कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क, टेक्सास, मॅसॅच्युसेट्स आणि इलिनोईस या पाच राज्यांमध्ये सर्वांत जास्त परदेशी विद्यार्थ्यांची संख्या आहे. जागतिक पातळीवरील अर्थव्यवस्था खालावण्याबरोबरच मायदेशातील आर्थिक समस्यांचाही या घटत्या संख्येशी संबंध असू शकतो, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. तसेच, भारतात वाढलेली उच्च शिक्षणाची संधी आणि इतर देशांमध्ये शिक्षणानंतर मिळणारी नोकरीची संधी यामुळेही अमेरिकेला जाण्याचे प्रमाण कमी होत चालले आहे.
यंदाच्या शैक्षणिक वर्षात १,००,२७० भारतीय विद्यार्थ्यांनी अमेरिकी विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतला आहे. भारतीयांच्या संख्येत घट होत असताना चीनमधून अमेरिकेला जाणार्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मात्र तब्बल २३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सौदी अरेबियातूनही सरकारी पाठबळावर अमेरिकी विद्यापीठांमध्ये प्रवेश घेणार्यांची संख्या वाढली आहे. परदेशी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून अमेरिकी अर्थव्यवस्थेलाही चालना मिळत असल्याचे त्यांच्या अर्थखात्याच्या अहवालात नमूद केले आहे.