जबलपूर, १४ नोव्हेंबर-प्रभू श्रीरामाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणार्या राम जेठमलानी यांच्याविरोधात हिंदू संतांमध्ये प्रचंड रोष व्यक्त करण्यात येत आहे. जेठमलानी यांची जीभ कापण्यासाठी एका गटाने ११ लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केल्यानंतर आता त्यांच्या चेहर्यावर जो थुंकेल, त्याला पाच लाख रुपयांचे बक्षिस दिले जाईल, अशी घोषणा जबलपूर येथील एका धार्मिक गुरूंनी केली आहे.
जबलपूर येथील गीताधाम आश्रमाचे धार्मिक गुरु महामंडलेश्वर स्वामी श्यामदास महाराज यांनी ही घोषणा केली. श्यामदास महाराजांची ही ऑफर खासकरून युवकांसाठी आहे. या घोषणेनंतर त्यांच्या भक्तांनी जेठमलानी यांच्या चेहर्यावर थुंकण्यासाठी तयारीही सुरु केली आहे.
श्यामदास महाराज यासंदर्भात म्हणाले, जेठमलानी यांचे कृत्य क्षमा करण्यायोग्य नाही. तरीही घोषणेतुन करण्यात आलेली शिक्षा अतिशय कमी आहे. हिंसेला प्रोत्साहान देण्यासारखी आपली घोषण नाही, असे स्पष्ट करुन ते म्हणाले, थुंकणे ही हिंसा नाही.
श्यामदास महाराज म्हणाले, माझ्या भक्तांनी जेठमलानी यांच्या घराचा पत्ता शोधण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी मला यासंदर्भात फोनवरून माहिती देखिल पुरवली आहे.