विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सेमीफायनल फिक्स होती ?

नवी दिल्ली, १२ नोव्हेंबर-वनडे विश्वचषकातील भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान मोहाली येथे झालेली सेमीफायनल फिक्स होती, असा खुलासा इंग्लंडचे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार ऍड हॉकिन्स यांनी आपल्या ’बुकी गॅम्बलर फिक्सर स्पाय’ या पुस्तकात केला आहे.

३० मार्च २०११ रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान सेमीफायनल सामना खेळवण्यात आला होता. भारताने या सामन्यात विजय मिळवून फायनलमध्ये प्रवेश मिळवला होता. उल्लेखनीय म्हणजे, सेमीफायनल पाहण्यासाठी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी हे देखील उपस्थित होते.

भारताने प्रथम फलंदाजी केली होती. पाकच्या क्षेत्ररक्षकांनी सचिन तेंडुलकरचे चार झेल सोडले होते. सामन्यादरम्यान भारतीय बुकी पार्थिवने संदेश पाठवल्याचे हॉकिन्स यांनी म्हटले. पार्थिवने टिवट मध्ये भारत पहिल्यांदा फलंदाजी करणार असून ते २६० धावा करतील. त्यानंतर १५ षटकात तीन गडी बाद होतील. पाकचे १०० धावांवर दोन विकेट जातील.

१५० वर त्यांच्या पाच विकेट जातील. त्याचबरोबर पाक हा सामना २० धावांनी पराभूत होईल, असे म्हटले होते.फिक्सिंगसंबंधीचे वृत्त फेटाळताना हे सर्व आरोप निराधार असल्याचे पाकचा फिरकीपटू सईद अजमलने म्हटले आहे. आगामी भारत-पाक मालिकेत अडथळा आणण्यासाठी असे आरोप करण्यात येत असल्याचे त्याने म्हटले आहे. सईद अजमलही सेमीफायनलमध्ये खेळला होता.