अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे आतापर्यंत जाहीर झालेले निकाल आणि कल पाहता , २७० पेक्षा जास्त इलेक्टोरल व्होट मिळवून बराक ओबामा हेच सलग दुस – यांदा अध्यक्षपदाची शपथ घेणार असे स्पष्ट दिसत आहे.मात्र अमेरिकेतील सर्व प्रसारमाध्यमांनी ओबामा अध्यक्ष झाल्याचे वृत्त देण्यास सुरुवात केली आहे.
ओबामांचा विजय निश्चित झाल्याचे स्पष्ट होताच अमेरिकेत आनंदाचे वातावरण आहे . आर्थिक मंदी , दहशतवाद , आऊटसोर्सिंग आदी समस्यांवर समाधानकारक उत्तर देण्याची क्षमता ओबामांमध्येच आहे , यावर विश्वास ठेवून अमेरिकेच्या जनतेने ओबामांना समर्थन दिले आहे . बेकारी हटवून डबघाईला आलेल्या अर्थव्यवस्थेत प्राण फुंकण्याची जादू घडवण्यासाठी जनतेने ओबामांना पुन्हा संधी दिली आहे , असे एका नागरिकाने ओबामांचा विजय सुस्पष्ट झाल्यावर सांगितले .
देशभरात घेण्यात आलेल्या मतदानपूर्व मतचाचण्यांमध्ये ओबामा आणि रोम्नी यांना जवळपास समसमान पसंती मिळाली होती. मात्र, ओहियोमध्ये ओबामा यांनी मोठी आघाडी घेत रोम्नी यांना पिछाडीवर सोडले. मंगळवारी झालेल्या मतदानावेळी बहुतांश राज्यांमध्ये संथ मतदान होत असल्याने मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. काही ठिकाणी रांगेला कंटाळून मतदान न करताच मतदारांनी निघून जाणेही पसंत केले. या निवडणुकीमध्ये अर्थव्यवस्था, बेरोजगारी, महिलांचे राजकारणातील प्रतिनिधित्व आणि स्थलांतर, या महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रचार झाला. ओबामा यांना महिलांसह हिस्पॅनिक्ससारख्या अल्पसंख्याक गटाचा जोरदार पाठिंबा मिळत असला, तरीही गेल्या निवडणुकीपेक्षा आफ्रिकन-अमेरिकन वंशाच्या नागरिकांमधील ओबामांचा पाठिंबा घटल्याचे सर्वेक्षणांतून दिसून आले. डेमोक्रेटिक आणि रिपब्लिकन या दोन्ही पक्षांनी ‘आमचाच विजय होणार’ असा दावा केला.